मूल (चंद्रपूर) : वळणावर एका चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या एसटी बसवर भरधाव दुचाकी धडकली. अशातच दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना ती एसटी बस त्या दुचाकीस्वारांच्या अंगावर उलटली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मूल-चामोर्शी मार्गावरील बोरचांदली उमा नदीजवळीस वळणावर झाला. युवकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी उलटली. मात्र, किरकोळ जखमा वगळता सुदैवाने एसटीतील सर्व १० प्रवासी सुखरूप आहेत.
संदीप रामदास कोकोडे (२८), प्रफुल्ल ऊर्फ भाऊराव गुरनुले (२४) दोघेही रा. फिस्कुटी, ता. मूल अशी मृतांची नावे आहेत. संदीप व प्रफुल्ल हे दोघे एमएच-३४/सीए-३७०४ क्रमांकाच्या दुचाकीने मूल येथील राइस मिलकडे जात होते. दरम्यान, एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात मूल येथून चामोर्शीकडे येणाऱ्या एमएच-०७/सी-९१५८ क्रमाकांच्या एसटीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरील या युवकांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस उलटली आणि त्या बसखाली दबून दाेघांचा मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने किरकोळ जखमा वगळता एसटीतील सर्व १० प्रवाशांना कुठेही मार लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी तातडीने दाखल होऊन पंचनामा केला. युवकांच्या मृतदेहांची मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर कुटुंबीयाकडे सुपूर्द करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने फिस्कुटी येथे शोककळा पसरली आहे. तपास मूलचे ठाणेदार सुमित परतेकी करीत आहेत.
वर्षभरापूर्वी झाला होता विवाह
अपघातातील मृत संदीप कोकोडे याचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. त्याला एक मुलगा आहे. त्यांच्या कुटुंबातील संदीप हा कर्ता पुरुष होता. आधीच घरची परिस्थिती बेताची असताना संदीपवर काळाने घाला घातल्याने कुटुंबच उघड्यावर पडले आहे.
गावावर शोककळा
संदीप आणि प्रफुल्ल हे दोघेही फिस्कुटी या एकाच गावातील आहे. अपघाताची वार्ता गावात पोहचताच गावकऱ्यांचा धक्काच बसला. एकाच वेळी गावातील दोन तरुण गेल्याने गावकरी शोकाकुल झाले आहेत.