वरोरा (चंद्रपूर) : बाहेर शहरात शिक्षण घेत असताना सुट्या असल्यामुळे पाच मित्र गावाला आले. चारगाव धरणावर जाऊन मौजमजा करायची, या बेताने ते धरणावर गेले. सेल्फी काढताना एकाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरा मित्रही बुडाला. दोघांच्या मृत्यूने वरोऱ्यात शाेककळा पसरली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
आयुष चिडे (१९, रा. बोर्डा, वरोरा), हार्दिक विनायक गुळगाणे (१९, रा. शेगाव) यांच्यासोबत अन्य तीन मित्र गुरुवारी दुपारी चारगाव धरणावर गेले होते. सेल्फी काढताना हार्दिक गुळगाणे याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. मित्राला बुडताना बघून आयुष चिडे हा पोहणे येत नसतानाही पाण्यात उतरला. तो मित्राला आणि स्वत:ला वाचवू शकला नाही. सेल्फीच्या नादाने त्यांच्या मैत्रीचा आणि आयुष्याचा प्रवास संपवला.
या घटनेची माहिती होताच शेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. धरणामध्ये पाणी अधिक असल्याने स्थानिक नावाड्यांच्या मदतीने गळ टाकून दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आले. लगेच दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.