लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नव्याने सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव मार्गावर भरधाव कारची दोन युवकांना धडक बसली. यात एकाचा जागीच तर दुसºयाचा रूग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने चंद्रपूर शहरातील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून स्टंटबाजीच्या नादात हा अपघात घडला. आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी मृताच्या कुटूंबियांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता.अविनाश पठारे आणि महेंद्र सोनार रा. चंद्रपूर अशी या मृतांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी कार चालकासह एका युवकाला अटक करण्यात आली आहे. तर एक युवक घटनास्थळावरून पसार झाला असून तो रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे. अविनाश पचारे व महेंद्र सेंचुरी असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. अपघातग्रस्त कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.रामाळा तलाव चौपाटीचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मात्र या सौंदर्यीकरणात झालेल्या चौपाटीला स्टंटबाजीचे ग्रहण लागले आहे. या मार्गावर अनेक युवक दुचाकीने धूम माजवतात. असेच तीन युवक एमएच ०२ सीएच ०१०१ या क्रमांकाच्या चारचाकी कारने स्टंटबाजी करत असताना फिरायला आलेल्या दोन युवकांना कारची धडक बसली. या धडकेत एक युवक किल्ल्याच्या परकोटावर जाऊन कोसळला. तर दुसरा युवक कारखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमीला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर रूग्णालयात नागरिकांचा जमाव निर्माण झाला. आरोपींना समोर आणण्याची मागणी करीत मृतदेह उचलण्यास कुटुंबियांनी नकार दिला. त्यामुळे तणाव वाढला. तेव्हा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. शनिवारी रात्री उशीरापर्यंत हा प्रकार सुरू होता. रविवारी सकाळी पुन्हा नागरिक जमा झाले. दुपारी १ वाजता पोलिसांनी समजूत काढून आरोपींना अटक केल्याची माहिती दिली, तेव्हा तणाव निवळला.
स्टंटबाजीने घेतला दोन युवकांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:33 PM
नव्याने सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव मार्गावर भरधाव कारची दोन युवकांना धडक बसली.
ठळक मुद्देकारचालकाने चिरडले : आरोपींच्या अटकेसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात राडा