परिमल डोहणे
चंद्रपूर : एमपीएससी संयुक्त गट (क) लिपिक, कर सहायक पदाच्या मुख्य परीक्षेपूर्वी परीक्षार्थ्यांना टंकलेखन प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. परंतु, मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अद्यापही प्रमाणपत्र मिळाले नाही. तसेच टीईटी घोटाळ्यामुळे २२ फेब्रुवारीला रद्द झालेल्या परीक्षेला अद्यापही मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे जे मुख्य परीक्षा देणार आहेत, परंतु, टंकलेखन प्रमाणपत्र नाही, अशांना परीक्षेपासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ३ एप्रिल रोजी संयुक्त गट (क) पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची मुख्य परीक्षा ६, १३, आणि २० ऑगस्टला होणार आहे. पूर्व परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वी टंकलेखन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. परंतु, मागील वर्षी झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र अद्यापही परीक्षार्थ्यांना मिळाले नाही. तसेच २२ फेब्रुवारी रोजी रद्द झालेली टंकलेखन परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा होणार आणि प्रमाणपत्र केव्हा मिळणार, आणि आयोगाला कसे सादर करणार असा प्रश्न आहे. त्यामुळे आपण मुख्य परीक्षेपासून वंचित तर राहणार नाही ना, अशी भीती परीक्षार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.