चंद्रपूर : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे हिंदुत्व स्वीकारले. शंभर काेटींच्या आरोपात अनिल देशमुख जमानतीवर आहेत. १५० कोटींच्या आरोपात सुनील केदार यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अशा लोकांसोबत देवेंद्रंची जमानत जप्त करण्याची भाषा बोलून ते नागपूरातून गेले. उद्धव ठाकरे हे स्वत: बॅकडोअर एन्ट्रीतून विधानसभेत गेले. त्यांनी कधीच निवडणूका जिंकल्या नाही. एकाही विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आले नाही. देवेंद्रजी पाचदा आमदार झाले आणि सहाव्यांदा रेकाॅर्ड मतांनी जिंकणार आहेत. देवेंद्रची जमानत जप्त करण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील कुठल्याही विधानसभा मतदार संघातून लढून जिंकून दाखवावे, असे थेट आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी सोमवारी चंद्रपूरात दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देवेंद्रजी जननेते आहेत. ठाकरेंनी स्वत:ची ओळख उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी दिली आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला उंची दिली. ते वाघ होते. देशाचे कर्तृत्व, नेतृत्व होते. त्यांचे पूर्ण हिंदूत्वाचे विचार उद्धव ठाकरे यांनी संपवून टाकले. बाळासाहेब बोलले होते की, मला काँग्रेससोबत जावे लागेल त्या दिवशी माझे दुकान बंद करेल. उद्धव ठाकरे किती लाचार आहेत हे दिसून येते, असा गंभीर आरोपही बावणकुळे यांनी केला.
नागपुरातील सभेत उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त दिसले. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे कटोरा घेऊन फिरत आहेत. मी तुम्हाला खासदारकी दिली, तुम्ही मला आमदारकी द्या. इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आली आहे. दिल्लीमध्ये दोन दिवस बसून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या घरासमोर फिरले, पण कुणीही मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा चेहरा मान्य करायला तयार नाही. काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष त्यांना विचारायला तयार नाही. अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये देवेंद्रजी आणि अमितभाईंवर टीका करतात, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मान्य नसल्यानेच पन्नास आमदार निघून गेले आणि पैशांच्या माेहासाठी गेले असा आरोप करतात. एकनाथ शिंदेंसारखा मर्दमराठा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला आहे. आता उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत आणि जनतेतून आमदारही होणार नाहीत, असा आरोपही बावणकुळे यांनी केला.