मूल : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने प्रशासनाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकानांना उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र गर्दी होणारे ठिकाण असलेल्या आठवडे बाजारावर मात्र बंदी घातली आहे. असे असताना मूल शहरात बुधवारी अघोषित आठवडे बाजार सुरु झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, यावेळी नगरपरिषदेकडून कारवाई करण्याऐवजी भाजीपाला विक्रेत्यांकडून पावतीची रक्कम वसूल केली जात असल्याने नगरपरिषदेची मूक संमती असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष घातले होते. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. मूल तालुक्यात आतापर्यंत ३,७८५ कोरोनाचे रुग्ण झाले असून ६४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र सध्या कोरोनावर नियंत्रण असून शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे मूल शहरात बुधवारी आठवडे बाजार भरत असतो. आठवडे बाजाराने गर्दी होत असल्याने बाजारावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र बुधवारी मूल शहरात आठवडे बाजार भरविण्यात आला असून सर्व नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. यावेळी नगरपरिषदेकडून कर स्वरुपात रक्कम वसूल करीत असल्याचे दिसून आले. यावरून नगरपरिषद प्रशासनाची मूक संमती असल्याचे दिसते. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने याबाबत उपाययोजना करण्याऐवजी कोरोना वाढीस नगरपरिषदेने खतपाणी दिल्याची चर्चा मूल शहरात सुरु आहे.