कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने प्रशासनाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकानांना शिथिलता दिली होती. मात्र डेल्टा व डेल्टा प्लस या विषाणूंचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाने दुकानाची वेळ ७ वरून दुपारी ४ वाजेपर्यंत आणली आहे. दर आठवड्याला भरला जाणाऱ्या आठवडी बाजारावरसुद्धा बंदी घातली आहे. असे असताना मात्र मूल शहरात बुधवारी आठवडी बाजार सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आठवडी बाजारात गर्दी वाढली असून कुठल्याही नियमांचे पालन केले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येते. यावरून मूलचा आठवडी बाजार कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनावर नियंत्रण असून शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
बॉक्स
नियमांची पायमल्ली
विशेष म्हणजे मूल शहरात बुधवारला आठवडी बाजार भरत असतो. आठवडी बाजाराने गर्दी होत असल्याने बाजारावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, आज बुधवारी मूल शहरात भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजारात सर्व नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. यावेळी नगर परिषदेकडून कर स्वरुपात रक्कम वसुल करीत असल्याचे दिसून आले. नगर परिषद प्रशासनाची याला मूक संमती असल्याचे दिसून आले. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने याबाबत उपाययोजना करण्याऐवजी कोरोना वाढीस नगर परिषदेने खतपाणी दिले जात असल्याची चर्चा मूल शहरात सुरू आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
कोट
दर बुधवारी मूल शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारावर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंदीच आहे. आठवडी बाजार भरणार नाही, यासाठी दक्ष राहण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना कल्पना दिली आहे. त्यामुळे बाजार भरविला जाणार नाही.
-सिध्दार्थ मेश्राम, मुख्याधिकारी नगर परिषद मूल.