लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी, आक्सापूर:चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावर गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ गोंडपिपरी पोलिसांनी चोर बोटी बियाणे वाहतूक करणारे पीकअप वाहन अडवून तपासणी केली असता त्यात तब्बल १२.९० क्विंटल चोर बीटी आढळून आले. त्यांची किंमत २५.८० लक्ष रुपये आहे. या बियाण्यावर बंदी असल्याने सर्व बियाणे जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास केली.
बियाणे वाहतूक करणाऱ्या वाहनाचा क्रमांक एमएच ३४ एम ८६३५ आहे. वाहन मालकाचे नाव आकाश गणेश राऊत (रा. गडअहेरी, ता. अहेरी, जि. गडचिरोली असे आहे. चंद्रपूरहून अहेरीकडे एका पिकअप वाहनात चोर बीटी भरून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस शिपाई मनोहर मत्ते व कर्मचारी यांनी गस्त करीत गुरुवारी रात्री ग्रामीण रुग्णालयासमोर वाहनाला अडविले. त्यामध्ये बियाणे आढळले.
'लोकमत'ने वेधले होते लक्षगोंडपिपरी तालुक्यात चोर बीटी बियाणे विक्री जोमात या शीर्षकाखाली १४ मे रोजी 'लोकमत'ने बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर कृषी विभाग व पोलिस विभाग अलर्ट झाला होता. मागील चार दिवसांपूर्वी भीमनी येथे ८६ लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त केले, तर ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आल्याने चोर बीटी बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे
भरारी पथकाची जुनगावातही कारवाईपॉभूर्णा : तालुक्यातील जुनगाव येथील घरात अनधिकृत चोर बीटी कापूस बियाणे विक्रीसाठी घरी बाळगले असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली व १७ किलोग्रॅम चोर बीटी (३२ हजार ६४० रुपये) बियाणे जप्त केले. सदर कारवाई तालुक्यातील तिसरी असून पोंभूर्णा तालुका आता चोर बीटी विक्री करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे.
अनधिकृत चोर बीटी बियाण्यास शासनाची परवानगी नसताना पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथे छुप्या मार्गाने चोर बीटी बियाणे शेतकऱ्यांना विक्री करून फसवणूक केली जात असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळताच २३ मे रोजी जुनगाव येथील एका घरात धाड टाकून १७ किलोग्रॅम चोर बीटी बियाणे जप्त केले. याप्रकरणी गणेश शेषराव आखरे रा. जुनगाव व जनार्दन नागाजी घोडे रा. देवाडा बु. यांच्याविरुध्द पोलिस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पंचायत समिती पोंभूर्णाचे कृषी अधिकारी नितीन धवस, मंडळ कृषी अधिकारी संतोष कोसरे, कृषी पर्यवेक्षक नेताजी वाकुडकर, पोलिस हवालदार सुनील कुळमेथे यांनी केली.