चंद्रपूर : वडिलांचा अपघात झाला, असे सांगून अल्पवयीन पुतणीचे काकानेच अपहरण केले. त्यानंतर छत्तीसगड राज्यात नेऊन तिच्यावर सतत वर्षभर अत्याचार केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी काकावर कलम ३६३, ३७३ (३), ३७६ (२), ३२३ पोक्सो कलमातंर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली होती. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश अ. व्ही. दीक्षित यांनी त्या काकाला २० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
२ मार्च २०२० रोजी पीडित मुलगी शाळेत गेली होती. दरम्यान, तिचा काका तिच्याकडे गेला. तुझ्या वडिलांचा अपघात झाला आहे. त्यामुळे आपणाला जायचे आहे, असे सांगून तिला छत्तीसगड येथे घेऊन गेला. तेव्हापासून ती मुलगी व काका बेपत्ता होते. घरच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. पडोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. मात्र कुठेच थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान, छत्तीसगड येथे एका चोरीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. तेव्हा तो छत्तीसगड येथे असल्याचे समोर आले. पोलीस व पीडित मुलीचे आईवडील तेथे गेल्यानंतर त्याने अपहरण करून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चंदा दंडवते यांनी विविध कलमांन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
संपूर्ण पुराव्यासह न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश अ. व्ही. दीक्षित यांनी संपूर्ण पुरावे तपासून त्याला कलम ३६३ अन्वये तीन वर्षे शिक्षा व तीन हजार रुपयांचा दंड, पोक्सोअंतर्गत २० वर्षांचा कारावास व पाच हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. सरकारी अभियोक्ता म्हणून स्वाती देशपांडे, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार मधुराज रामनुजवार यांनी भूमिका बजावली.