चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे. परंतु, त्यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणेच देश चालत आहे की, नाही हे सजग डोळयाने बघणे गरजेचे आहे. आजही मनुच्या समर्थकांचे राज्य असंवैधानिक पद्धतीने देशावर सुरु आहे. अद्यापही मनुस्मृती जिवंत असून संस्कार आणि परंपरेच्या गोंडस नावाखाली स्त्रियांना गुलामीत ठेवण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिजाऊ सावित्री रमाई विचारमंचच्या संस्थापिका, बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा बेहेरे गावतुरे यांनी केले.
मनुस्मृतीचे दिनाचे औचित्य साधून जिजाऊ सावित्री रमाई विचारमंच, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ नगीनाबाग, संत जगनाडे महाराज पंचतेली मंडळ, भुमिपुत्र ब्रिगेड, मुक्ता युवा वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मंडळाच्या उपाध्यक्ष छाया सोनुले, संत जगनाडे महाराज पंचतेली मंडळाच्या चंदा वैरागडे, भुमिपुत्र ब्रिगेडच्या माया कोसे, रूपेश चहांदे, सुरज मत्ते, मुक्ता युवा वाहिनीच्या श्वेता पेटकुले, निधी निकोडे, अक्षय किन्नाके, जनाधार मंचच्या प्रियंका चव्हाण, अरविंद दुधे, विपिन रामटेके, अतुल बांभोरे, राजस खोब्रागडे, अस्मिता सोनटक्के, माधवी डोंगरे आदी उपस्थित होते. डॉ. अभिलाषा गावतुरे पुढे म्हणाल्या, देशातील मनुव्यवस्था मुठभर लोकांच्या कल्याणासाठी कार्य करते. त्यामुळे शेतकरी, कामगार, दलित व महिलांवर अन्याय वाढला आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला समानता बहाल केली आहे. त्याच्या मौलिक अधिकाराच्या रक्षणासाठी जिजाऊ, फुलेश शाहु व बाबासाहेबांच्या अनुयायांना काम करायचे असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती.