चंद्रपूर : शनिवारी रात्री सिंदेवाही तालुक्यात अवकाशातून गोलाकार रिंग व धातूचे सिलिंडर कोसळले. याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले हे अवशेष संबंधित पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आले आहे. इतर ठिकाणी अशा आणखी वस्तू आढळल्यास कदापि स्पर्श करू नये. तसेच सेल्फी घेण्याचे टाळावे. याबाबत तत्काळ जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहनही गुल्हाने यांनी केले आहे.अवकाशातून पडलेल्या तप्त वस्तू नक्की कशाच्या व कशामुळे पडल्या, याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पाचवे सिलिंडर सापडलेब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात अवकाशातून पडलेले रॉकेट सिलिंडर सापडणे सुरूच आहे. आतापर्यंत चार सिलिंडर सिंदेवाही तालुक्यात सापडली. पाचवे सिलिंडर ब्रह्मपुरी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या बोदरा किटाळी येथे जंगलात सापडले. मोहफुले गोळा करायला गेलेल्या बोदरा येथील नागरिकांना हे सिलिंडर दिसले. सर्व पाचही सिलिंडर गोलाकार आकारातील आहेत. आणखी किती अवशेष आकाशातून कोसळले याचा नेमका अंदाज आलेला नाही. या अवशेषाबाबतचे रहस्य मात्र अद्यापही उलगडलेले नाही. अवकाशातून पडलेल्या या वस्तू सॅटेलाइटचे अवशेष असल्याचे बोलले जात आहे.