चंद्रपूर : नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने ‘नमो आवास’ घरकूल योजना सुरू केली आहे. याअंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यात १० लाख घरे निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारे आयोजित सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमात ते बोलत होते. प्रियदर्शनी सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जान्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, माजी जी.प.अध्यक्ष संध्या गुरनुले, अति जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी सुभाष पवार, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, कृषी अधिकारी बऱ्हाटे, आत्माच्या प्रमुख प्रीती हराळकर, समाज कल्याण सहा. आयुक्त अमोल यावलीकर, वाकुलकर, सुरेश पेंदाम आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, सर्वांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यशवंतराव मुक्त वसाहत योजनेंतर्गत विशेष बाब म्हणून २८०३ घरे मंजूर करण्यात आली आहेत. महाप्रित अंतर्गत म्हाडामध्ये १० हजार घरे बांधण्यात येणार आहेत. याबाबत नुकताच चंद्रपूर मनपा आणि महाप्रित यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. त्यामुळे वाघाच्या गतीनेच शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या यशोगाथा पुस्तिकेचे तसेच विभागाच्या योजनांची माहिती असलेल्या पॉकेट डायरीचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले. संचालन सचिन फुलझेले यांनी तर आभार पूनम आसेगावकर यांनी मानले.