सुधाकर गिरडकर यांची गाय केली ठार : वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी
विसापूर : येथील शेतकरी सुधाकर गिरडकर यांची गाय शनिवारी दुपारी विसापूरजवळच्या जंगलात चरायला गेली असता दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून ठार मारले. यामुळे शेतकऱ्याचे माेठे नुकसान झाले. विसापूर गावाच्या जवळच वाघाचे अस्तित्व दिसत असल्याने नागरिक दहशतीत आहेत.
बल्लारपूर वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या घटनेमुळे विसापूर येथे शेतकऱ्यांत वाघाची दहशत पसरली आहे. विसापूर येथील सुधाकर गिरडकर हे पाळीव जनावरे पाळून दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्याकडे ५ ते ६ गायी आहेत. दररोज गाईला चरण्यासाठी जवळील जंगलात घेऊन जातात. शनिवारी नेहमीप्रमाणे गाईला चरण्यासाठी जंगलात घेऊन गेले. मात्र जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने गाईवर हल्ला करून ठार केले. अशातच दुसऱ्या गाईने ठार केलेल्या गाईला साेडविण्यासाठी प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात वाघाने जखमी केले. या घटनेमुळे सुधाकर गिरडकर यांचे नुकसान झाले आहे. बल्लारपूर वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी विसापूर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.