चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच धरणांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यातील जलसाठा ५० टक्क्याच्या खाली आला आहे. त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस न आल्यास जिल्ह्यातील नागरिकांना यंदा भीषण जलसंकटाशी सामना करावा लागणार आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई व आसोला मेंढा प्रकल्पात सध्या समाधानकारक जलसाठा असला तरी येत्या काही दिवसांत तोही कमी होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात लहानमोठे ११ प्रकल्प आहेत. त्यात आसोला मेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई प्रकल्प, चारगाव प्रकल्प, अमलनाला प्रकल्प लभानसराड प्रकल्प, पकडीगुड्डम प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, दिना प्रकल्प व इरई धरणाचा समावेश आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हे अकराही धरणे तुडूंब भरली होती. मात्र जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही दमदार पावसाचे आगमन न झाल्याने या धरणातील पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. ११ पैकी चंदई प्रकल्प व लभानसराड हे दोन प्रकल्प पूर्णत: आटले आहेत, तर पकडीगुड्डम या प्रकल्पात केवळ १.२४ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पाची क्षमता ११.७९७ द.ल.घ.मी.जलसाठा शिल्लक आहे. चंदई प्रकल्पाची क्षमता १०.६९ द.ल.घ.मी. आहे, तर लभानसराड प्रकल्पाची क्षमता ७.३५१ आहे.यंदा निसर्ग कोपला. केवळ एक दोनदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट तीव्र उन्हामुळे धरणातील पाण्याची पातळी खोल गेली. अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळात नागरिकांना भीषण जलसंकटाशी सामना करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
धरणातील जलसाठा ५० टक्क्यांखाली
By admin | Published: July 12, 2014 11:35 PM