राजुरा : राजुरा शहराशी माझे कौटुंबिक नाते आहे. माझे वडील स्वर्गीय रामचंद्रराव धोटे हे राजुरा नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष होते. त्यानंतर आमदार झाले. त्यामुळे आमचे संपूर्ण आयुष्य राजुरा शहरात गेलेले आहे. या शहराशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. येणाऱ्या काळात शहरातील संपूर्ण विद्युत व्यवस्था व सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था भूमिगत करण्यात येईल, असे आश्वासन आमदार सुभाष धोटे यांनी दिले.
येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, शब्बीर भाई, काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, कुंदा जेणेकर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, रमेश नले, विलास बोंगीरवार, राधेश्याम अडनिया, हर्जित सिंग, आनंद दासरी, संध्या चांदेकर, राजू डोहे, प्रभाकर येरणे, छोटू सोमलकर आदींची उपस्थिती होती. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मागील पाच वर्षात झालेल्या विविध कामांचा उल्लेख नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केला.