आंदोलन, मोर्चा, बंदोबस्त, सण, उत्सव या काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड्स आपले कर्तव्य बजावत असतात. जिल्ह्यात १०१४ होमगार्ड्सची नोंद आहे. होमगार्ड्सना वर्षातील सहा महिने ड्युटी देण्याचा गृहविभागाचा निर्णय आहे. त्याआधारावर कोरोनाकाळात ४०० होमगार्ड्सना आळीपाळीने ड्युटी देण्यात येत आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग वयस्कर लोकांमध्ये होत असल्याने शासनाने ५० वर्षांवरील होमगार्ड्सना बंदोबस्त न देण्याचा निर्णय घेतला. या आदेशामुळे जिल्ह्यातील सुमारे १०० जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
यातील अनेकांच्या कुटुंबांना ड्यूटी बजावल्यानंतर मिळणाऱ्या मानधनाचा आधार मिळत होता. पण, वयाची अट असल्याने त्यांच्यावर बेकारीची वेळ ओढावल्याचे चित्र आहे.
बॉक्स
५० टक्के लसीकरण
पोलीस विभागाला प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे त्याचे लसीकरणाचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याच पातळीवर होमगार्ड्सचेही लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात ५० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती होमगार्ड कार्यालयातून मिळाली.
बॉक्स
आम्ही जगायचे कसे?
वर्षातून सहा महिने ड्युटी मिळत होती. त्यातून मिळणाऱ्या मानधनातून घर चालत होते. परंतु, आता ड्युटीच लावण्यात येत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नियमानुसार आमच्या ड्युट्या लावण्यात याव्या.
- होमगार्ड
अधे-मधे होमगार्डची ड्युटी मिळत असल्याने कुठेही स्थायी नोकरी करू शकलो नाही. आता पन्नाशी गाठली आहे. त्यामुळे इतर ठिकाणी नोकरी मिळणार नाही. त्यात शासनाने ५० वर्षांवरील होमगार्डची ड्युटी लावणे बंद केल्याने जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- पुरुष होमगार्ड
--------
पतीचा छोटासा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमुळे तो बंद आहे. होमगार्डच्या मिळणाऱ्या मानधनातून कुटुंबाला आधार मिळत होता. मात्र आता ड्युटीच मिळत नसल्याने आर्थिक अडचण भासत आहे.
- महिला होमगार्ड
वयस्कर लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने ५० वर्षांवरील होमगार्ड्सला सध्या ड्युटी देऊ नये, असे आदेश आहेत. त्यामुळे त्यांच्या ड्युटी लावणे बंद आहे. कोरोनाचा संसर्ग टळल्यानंतर त्यांना पुन्हा नियमांप्रमाणे कर्तव्यावर घेण्यात येणार आहे.
- अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्ड्स १०१४
महिला होमगार्ड्स संख्या १८०
५० पेक्षा जास्त असलेले १००
सध्या सेवेत असलेले ४००