विकास खोब्रागडे
पळसगाव (पि.) : गावखेड्यातील जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून बांबूची ओळख आहे. बांबू हा आधुनिक युगाचा कल्पवृक्ष आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता बांबू या वनउपजामध्ये आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत बांबूची साथ असते. याच बांबूने आर्थिक दुष्टचक्रावर मात करता येते. ही बाब हेरून एका २३ वर्षीय बेरोजगार युवकाने आपल्या जगण्याचा नवा मार्ग शोधला आहे. लीलाधर सीताराम आत्राम, असे या युवकाचे नाव आहे. ताडोबा बफर क्षेत्रालगतच्या पळसगाव, ता. चिमूर येथील तो रहिवासी आहे.
यापूर्वी गावातील कारागिरांना बांबूपासून सूप-टोपल्यांच्या पलीकडे जाता आले नाही. मात्र, या गुणी युवकाने आपल्या मेहनतीच्या बळावर मातीपासून गणेशमूर्ती बनविल्या. काही दिवस त्याने बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेमार्फत हस्तकलेची कामे केली. मात्र, कोरोनामुळे ही कामेही बंद अवस्थेत असल्यामुळे जीवन जगणे कठीण झाले. कुटुंबाचा गाडा चालविणे अवघड होऊन बसले. अशातच त्याला गावातच बांबू हस्तकलेच्या वस्तूंचे लहान दुकान टाकून ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना त्या विकण्याची कल्पना सुचली. या वस्तूंना मोठी मागणी असून, किंमतही बऱ्यापैकी मिळते हे तो हेरून होता. अखेर लीलाधरने आपल्या कल्पनेला मूर्तरूप दिले. त्याचा हा व्यवसाय त्याच्या कुटुंबाचा आधार बनला आहे. बेरोजगारीवर मात करताना आपल्यातील एखादी कला आणि त्याला आत्मविश्वासाची जोड दिल्यास रोजगार उपलब्ध करणे कठीण नाही, हेही त्याने सिद्ध करून दाखविले.