ब्रम्हपुरी : येथील नगर परिषद कार्यालया अंतगर्त येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनातील सफाई रोजंदारी कामगारांवर गेल्या ऑगस्ट २०२० पासून बेरोजगारी लादण्यात आली आहे. याला कारणीभूत संबंधित कंत्राटदारावर कारवाई करा, अशी मागणी न.प. सफाई मजूर कामगार संघटनेने सहायक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की ब्रम्हपुरी नगरपरिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे, रोड सफाई व कचरा संकलित गाडीचे कंत्राट तथागत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले. गेल्या ऑगस्ट २०२० च्या लॉकडाऊनच्या काळात कामगारांना मास्क व इतर आवश्यक साहित्य पुरविण्याची मागणी केली. त्यावेळी कंत्राटदाराने बालगंधर्व बेदरे, दीपक मसराम , अमीर सूर्यवंशी, राहुल आंबोरकर, भरत राऊत, चंद्रकला धनविजय या कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले व आजपावेतो त्यांना पूर्ववत केले नाही. सदर कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. या संदर्भात न.प.मुख्याधिकारी व प्रशासन यांच्यासोबत कामगार व संघटनेने वारंवार चर्चा केली. अर्ज, विनंती केली. मात्र प्रशासनाने कायमचा कानाडोळा केला.
त्यामुळे संतप्त कामगार व अ. भा .सफाई मजूर कॉंगेसचे पदाधिकाऱ्याचे शिष्टमंडळ यांनी सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांच्याशी चर्चा केली व सबंधित कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी अ.भा.सफाई मजूर कामगार कॉंगेसचे राज्य सहसचिव राजेश रणशूर, कामगार नेते गोवर्धन काळे, शेतकरी व कामगारांचे नेते विलास गोदोळे, कामगार प्रमुख बालगंधर्व बेदरे, ता. अध्यक्ष दिपक मसराम, कार्याध्यक्ष राहुल आंबोरकर, भरत राऊत, अमीर सूर्यवंशी, चंद्रकला धनविजय आदी उपस्थित होते.