ठसे तज्ञ व श्वान पथक दाखल
कुलूप तोडून आलमारीतील ३४ हजार रु. लंपास
नवरगाव : ग्रामपंचायत कार्यालय रत्नापूर येथील कुलूप तोडून आलमारीतील ३४ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने स्थानिक प्रशासन हादरले.
सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत रत्नापूर येथील ग्रामपंचायत गावाच्या मध्यभागी व गावापेक्षा उंच टेकडीवर आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे सहज लक्ष ग्रामपंचायतकडे जाते. विशेष म्हणजे आतापर्यंत येथील शासकीय कार्यालयात चोरी झाली नव्हती. सध्या गावामध्ये नळाचे कनेक्शन देणे सुरू असल्याने शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात गर्दी होती. त्यामुळे ज्येष्ठ लिपिक प्रमोद भरडे यांनी कामाच्या व्यापामुळे दोन-चार दिवसात जमा झालेली रक्कम बँकेत जमा न करता कार्यालयाच्या आलमारीत ठेवली होती. तसेच संगणक चालक संजय बोरकर यांच्याकडे बँक ऑफ इंडियाचा पॉइंट असल्याने भरडे यांनी एका बचत गटाची रक्कम आठ हजार रुपये बोरकरकडे भरण्यासाठी आणली होती. परंतु कामामुळे ती रक्कमसुध्दा त्याच आलमारीत ठेवली. मात्र अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायतचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आलमारीमध्ये असलेले ३४ हजार रुपये चोरून नेले. शनिवारी सकाळी रोजगार सेवक संतोष धुर्वे ग्रामपंचायतमध्ये गेले असता चोरीचा प्रकार लक्षात आला. सरपंच कविता सावसाकडे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी श्वान पथकाला आणून चौकशी केली असता श्वानाने येथील कर्मचारी यांच्याकडे दिशा निर्देश केल्याने संशयित म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद भरडे, रामकृष्ण गरमळे व सुनील पालकर यांची विचारपूस सुरू केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत कुणालाही अटक झालेली नव्हती.
040921\img_20210904_150625.jpg
हिच चोरट्यांनी फोडलेली आलमारी , श्वान पथक. आणि नागरीकांची गर्दी