नागभीड : युद्धाचे परिणाम युद्धानंतर जाणवतात असे म्हणतात. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीबाबतही हेच म्हणता येईल. एकीकडे दारुबंदीचे जोरदार समर्थन होत असताना दुसरीकडे मात्र दारु व्यवसायाशी निगडीत असलेले छोटेछोटे धंदे बंद तर झालेच. पण त्याचबरोबर नागभीड शहरातील एकंदर ‘मार्केटिंग’ वर सुद्धा या दारुबंदीचा परिणाम जाणवत असल्याचे बोलल्या जात आहे. दारूबंदीचे महिलांनी मात्र स्वागत केले आहे.नागभीड शहराचा विचार केला तर या ठिकाणी देशी दारुची दोन तर विदेशी दारुची चार दुकाने होती. या दुकानांच्या अवतीभोवती अनेकांनी आपले लहान-लहान व्यवसाय थाटले होते. गेल्या एक दोन वर्षात या परिसरात भाजीपाला, अंडी, मासे विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर लागली होती. आता या परिसरात कोणीच फिरकत नसल्याने या छोट्या-छोट्या व्यवसायांवर अवकळा आली आहे. याच परिसरात चहा, नाश्ता व अन्य पदार्थाच्या विक्रीचीही दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या विक्रीवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे एका व्यवसायिकाने ‘लोकमत’ला सांगितले.दुसरे एक व्यावसायिक लोकमतशी बोलताना म्हणाले, खेड्यापाड्यावर दारु मिळत नसल्याने लोक मुद्दाम या निमित्ताने नागभीडला यायचे. आपली हौस पूर्ण केल्यानंतर मुलांसाठी ५-५० रुपयांचे सामान खरेदी करायचे. पण आता लोकांचे येणेच बंद झाल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम जाणवू लागला आहे. नागभीडचा आठवडी बाजार गुरुवारी भरत असतो. दारुबंदी १ एप्रिलला लागू झाली. २ एप्रिलला येथील आठवडी बाजारात एरवी सारखा उत्साह नव्हता. खेड्यापाड्यातील लोक फार कमी बाजारात दिसत होते, अशी माहिती एका जाणकाराने दिली. (तालुका प्रतिनिधी)
दारुबंदीचा सर्वच व्यवसायांवर विपरित परिणाम
By admin | Published: April 10, 2015 12:56 AM