चंद्रपुरात कामगारांसाठी २०० खाटांचे रुग्णालय उभारणार, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची घोषणा
By राजेश मडावी | Published: June 24, 2023 06:15 PM2023-06-24T18:15:27+5:302023-06-24T18:16:13+5:30
काँग्रेस ओबीसीविरोधी असल्याचा आरोप
चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरात कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कामगारांच्या आरोग्यासाठी २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय (ईएसआयसी) उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय पर्यावरण, वने, श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, काँग्रेस पक्ष ओबीसीविरोधी आहे. काँग्रेसने मंडल आयोग रिपोर्ट लागू केला नाही, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार डॉ. कल्पना सैनी, आमदार संजय उके, भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण देवराव भोंगळे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या पूर्तीनिमित्त भाजपतर्फे ‘मोदी @ 9’ या महाजनसंपर्क अभियानांतर्गत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव दौऱ्यावर आहेत.
केंद्र सरकारच्या नऊ वर्षांतील विकासकामांची माहिती देताना ना. यादव म्हणाले, २०१४ नंतरच जनसामान्यांमध्ये आत्मनिर्भरतेचा भाव निर्माण झाला. काँग्रेस सरकारच्या काळात सुशासन नव्हते. सरकार विकासकामांसाठी निधी पाठवायचे. मात्र, तो निधी लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. मोदी सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहे. प्रधानमंत्री घरकुल अंतर्गत साडेतीन कोटी घरे निर्माण केली. ११ कोटी ७२ लाख शौचालये बांधली. १२ कोटी पाणी पुरवठा जोडणी दिल्या. ८० कोटी जनतेला धान्य पुरवठा, जनऔषधी केंद्र, पाच लाख आरोग्य विमा, जनधन खात्यामुळे १०.३० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले, असा दावा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला.
२०१४ नंतर २ हजार किलोमीटर जंगल वाढले
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालमध्ये मुस्लिमांचा समावेश ओबीसी समाजात चुकीच्या पद्धतीने करत आहे. हंसराज अहिर यांनी ही बाब उघडकीस आणली. तेलंगणा व राजस्थानात हाच प्रकार सुरू आहे. मोदी सरकारच्या काळात १५ शहरांत मेट्रो, जल रस्ते निर्माण केले. ७४ शहरांत विमानतळ झाले. ७०० नवीन मेडिकल कॉलेज, ६३ हजार नवीन वैद्यकीय जागा, ७ आयआयएम, ३९९ नवीन विद्यापीठे निर्माण केली. जगात आज भारताची पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. २०१४ नंतर २ हजार किलोमीटर जंगल वाढले, असेही ना. यादव यांनी सांगितले.