चंद्रपूर : गडचांदूर बसस्थानकाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रस्तावित असताना शुक्रवारीभारत राष्ट्र समितीच्या वतीने मंजुरी न मिळालेल्या गडचांदूर बसस्थानकाला प्रतिकात्मक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसस्थानक नाव देत भूषण फुसे यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले.
औद्योगिक शहर असलेल्या व चार चार सिमेंट उद्योग सभोवती असलेल्या शहरात तसेच जिवती व कोरपना तालुक्याची मूख्य बाजारपेठ असलेल्या शहरात बसस्थानक नाही. मागील कित्येक वर्षांपासून गडचांदूर येथे बसस्थानक निर्माण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी असताना शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
याकरिता 11 ऑगस्ट रोजी गडचांदूर बसस्थानक परिसरात भारत राष्ट्र समितीच्या वतीने गडचांदूर बस स्थानक तत्काळ निर्माण करावे, या मागणीसाठी प्रतिकात्मक गडचांदूर बसस्थानकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव मा. एकनाथ शिंदे गडचांदूर बसस्थानक असे नाव देत अनोखे आंदोलन करण्यात आले. या मा. एकनाथ शिंदे गडचांदूर बसस्थानकाचे लोकार्पण जिवती ते गडचांदूर नेहमी प्रवास करणारे जिवती तालुक्यातील नागरिक रामराव शेळके व नंद आप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाने गडचांदूर करांचे लक्ष वेधले. आता तरी राज्यसरकाने या गंभीर विषयाची दखल घेऊन गडचांदूर बस स्थानक उभारणीला परवानगी घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गडचांदूर बस स्थानक आंदोलन भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते राकेश चिल्कुलवार अजय साकीनाला, सनी रेड्डी, धनंजय बोर्डे, महेंद्र ठाकूर, संघर्ष गडपिल्ली, प्रदीप इरकला. अश्विन वाघमारे व्यंकटेश जंजरला. सामाजिक कार्यकर्ते सुरज उपरे, कैलास चीतलवार. दिलीप कांबळे आदींची मोठया संख्येने उपस्थिती होती.
महत्वाचे म्हणजे राज्यात नव्यानेच उदयास आलेल्या भारत राष्ट्र समिती पक्षाचे हे जिल्ह्यातील पहिलेच आंदोलन असून, हे आंदोलन भारत राष्ट्र समिती या पक्षकरिता लक्षवेधी ठरले.