गोवरी : कापूस पिकांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. फळधारणेवर आलेल्या कपाशीला बाधा झाल्याने पिकांची तर वाढ खुंटलीच. परंतु संपूर्ण पिक उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरीपुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला असून शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्हा तर नेहमीच कापूस उत्पादनात अग्रेसर असतो. कापूस हे नगदी पिक असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. सध्या कपाशीचे पीक फळधारणेवर आले आहे. दिवस-रात्र काबाडकष्ट करून पिकांना वाढविले आहे. मात्र त्याच पिकांवर आता अज्ञात रोगाचा विळखा पडला आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी-चिंचोली परिसरात कपाशीवर अज्ञात रोगाने कहर केला आहे तर गोवरी येथील तुळशीराम जुनघरी या शेतकऱ्यांचा शेतातील दोन एकरातील कपाशीचे पीक अज्ञात रोगाने उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कपाशीवरील रोग हटविण्यासाठी अनेकदा कपाशीवर फवारणी केली. मात्र अज्ञात रोगापासून कपाशीची सुटका झाली नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.कपाशीवर चूरडा व अन्य रोगांनी अतिक्रमण केले आहे. कपाशीला अज्ञात रोगांनी ग्रासल्याने कपाशीची वाढ पूर्णत: खुंटली आहे. महागड्या औषधाची फवारणी करून कपाशी पिकाला वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे. मात्र पिकांवरील रोग हटण्याची कोणतेच चिन्ह दिसत नाही. शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळत चालला आहे. अस्मानी सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी पूरता कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांची सारी भिस्त कपाशीवर आहे. (वार्ताहर)कृषी विभागानेशेतकऱ्यांना मार्गदर्शन करावेकपाशीच्या पिकावर अज्ञात रोगाचे थैमान व अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांना त्यापासून वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत आहे. त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास कपाशीचे पीक वाचविता येऊ शकते.कपाशीवर सध्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अज्ञात रोग व अळीने अतिक्रमण केल्यामुळे किटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. परंतु कपाशीवर त्याचा फारसा परिणाम होत नसल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे.- श्रीधर जुनघरी, शेतकरी, गोवरी
अज्ञात रोगाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका
By admin | Published: September 20, 2016 12:45 AM