लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकट त्यातच अनेकांनी लस घेतली असल्याने मागील काही दिवसांमध्ये रक्तदात्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. असे असतानाच आता डेंग्यू तसेच इतर आजारांनी तोंड वर काढल्याने रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुडवडा असून, सद्य:स्थितीत आणीबाणीची वेळ आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी रक्तपेढीमध्येही रक्त नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी तारांबळ उडत आहे. दरम्यान, रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांनी शासकीय तसेच सामाजिक संस्थांना भावनिक पत्र पाठवून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे रक्तदात्यांची संख्या घटली. मध्यंतरी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे काही प्रमाणात रक्तसाठा जमा झाला होता. आता जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले असून, त्यांच्यासह इतर आजारी रुग्णांना रक्त द्यावे लागत आहे. साठा कमी आणि मागणी वाढल्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुडवडा आहे. काही रक्तदाते शासकीय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करीत आहेत. मात्र, दररोजची मागणी जास्त असल्याने तेही कमी पडत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन जागोजागी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करणे सध्यास्थितीत अत्यावश्यक आहे.
असा आहे शिल्लक रक्ताचा साठासद्य:स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रक्तपिशव्यांचा अगदीच अल्प साठा आहे. यामध्ये ए ग्रुपची एकही पिशवी शिल्लक नाही. बीच्या ४ ते ५ बाटल्या, तर ओ रक्तग्रुपच्या केवळ १० बाटल्या उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणी केल्यास रक्त कुठून आणायचे, असा बिकट प्रश्न सध्या येथील शासकीय रक्तपेढीतील अधिकाऱ्यांना पडला आहे.
लोकमतने आयोजित केलेल्या शिबिरांमुळे झाला होता मोठा आधारलोकमतचे संस्थापक संपादक स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण राज्यभर रक्तदान शिबिरे घेतली होती. चंद्रपूर जिल्ह्यातही रक्तदान शिबिरे आयोजित केली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासकीय रग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये मोठा रक्तसाठा जमा झाला होता. यामुळे मोठा आधार झाला होता.
मागील काही दिवसांत रक्ताची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या घटल्यामुळे तुडवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे. यामुळे रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळेल.-डाॅ. अनंत हजारेजिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी, चंद्रपूर