मच्छीनाल्याचे अस्तित्व धोक्यात
चंद्रपूर : मूल मार्गावरील मच्छीनाल्याचा उपयोग काही नागरिक कचरा टाकण्यासाठी करीत असल्यामुळे नाल्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेने नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बांधकाम साहित्यामुळे अडथळा
चंद्रपूर: शहरात अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर-नागपूर रोडवरील वरोरा नाका ते वडगाव पर्यंतही अनेक ठिकाणी साहित्य टाकून ठेवण्यात आले आहे.
नियमानुसार, असे साहित्य रस्त्यावर टाकता येत नाही. परंतु महानगरपालिकाही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे शहरात विविध आजारांचा फैलाव होत आहे. त्यामुळे डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांंपासून शहरात डेंग्यू, मलेरिया रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
भुरट्या चोरांमुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे़ हातात लागतील त्या वस्तू पळविण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे़. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.
व्यवसायात घरगुती सिलिंडर
चंद्रपूर : मागील काही दिवसांंमध्ये सिलिंडरच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना सिलिंडर घेणे कठीण जात आहे. त्यातच घरगुती वापराचे सिलिंडर काही व्यावसायिक व्यवसायाकरिता वापर करीत अधिक नफा कमविण्याचा प्रयत्न करीत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
वाहनतळाअभावी वाहनधारक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील बहुतांश इमारतीमध्ये वाहनतळाची जागा नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही वर्षांंपूर्वी ज्या इमारतींना वाहनतळ नाही अशा इमारतींवर कारवाई केली होती. यामध्ये काही इमारतधारकांनी वाहनतळाची व्यवस्था केली. मात्र आता परिस्थिती जैसे थे झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकांनी याकडे लक्ष देऊन वाहनतळाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : परिसरातील उद्योगांमुळे तसेच सातत्याने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे ध्वनी तसेच वायू प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ऊर्जानगर मार्गावर मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जाते. त्यामुळे कोळशाचे बारीक कण वातावरणात मिसळून हवा प्रदूषित होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.