लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शैक्षणिक अर्हता नसताना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन फॅसिलिटी व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली. त्यामुळे संबंधित सर्व शैक्षणिक अर्हता कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर करवाई करावी, अशी मागणी बोर्डा येथील माजी सरपंच डोमा उपासराव तेलंग यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे तक्रारीतून केली आहे.
तक्रारीनुसार, आरोग्य विभागात राष्ट्रीय अभियानांतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूरद्वारा कंत्राटी तत्वावर फॅसिलिटी मॅनेजर टेलिमेडिसिन पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात शैक्षणिक अर्हता डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कम्युनिकेशन व आयटी अनुभव मागितला होता. त्याप्रमाणे उमेदवारांना परीक्षा व मुलाखतीस पाचारण करणे बंधनकारक असताना उपजिल्हा वरोरा येथील एका कर्मचाऱ्याची शैक्षणिक अर्हता नसताना लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीस बोलावल्याचे माहिती अधिकारातून पुढे आली. पात्र उमेदवारांना डावलून निवड समितीने अपात्रला पात्र ठरविले व नियुक्ती आदेश दिला, असे माजी सरपंच डोमा तेलंग यांचे म्हणणे आहे.
शैक्षणिक अर्हता कॉलमध्ये खोडतोड माहिती अधिकारात प्राप्त पत्रात लेखी परीक्षेत निवड झालेल्या कर्मचाऱ्याला लेखी परीक्षेत ३० तर एका महिला उमेदवाराला ३५ गुण आहेत. प्रत्यक्ष या पदावर नियुक्त कर्मचाऱ्याची शैक्षणिक अर्हता डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कम्युनिकेशन, आयटी अशी शैक्षणिक अहर्ता खोडतोड करून प्रिंट केली दिसते. दुसऱ्या पत्रात त्याच कर्मचाऱ्याची शैक्षणिक अर्हता बी. एम. सी. एम. बी. ए. दाखविल्याचा आरोप तेलंग यांनी केला. अन्य उमेदवारांसमोर खोडतोड नाही.
मुलाखत प्रोफार्ममध्ये या कर्मचाऱ्याची खोडखाड करून ७१. ५ व्हॅल्यू दाखविली. मात्र दुसऱ्या उमेदवाराची ८२.०७ दाखवली. लेखी व तोंडी परीक्षेतील पत्रात ४८.७५ गुण आहे. परंतु, या पत्रातही खोडतोड केल्याचे दिसते. अन्य उमेदवारांना ५१.२५, ५१.०० असे गुण आहे. इतर उमेदवारांच्या नावासमोर पत्रात खोडतोड नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.