वसंत खेडेकर
फोटो
बल्लारपूर : प्रचंड मेहनत घेण्याची तैयारी, जिद्द आणि उत्तम नियोजन असले की कोणत्याही क्षेत्रात यशाचे शिखर गाठता येते आणि आणि त्यात सातत्य ठेवले की ते स्थान कायम राखता येते, याची प्रचिती येथील परिश्रमी शेतकरी राजू शर्मा यांनी, शेतीला पूरक दुग्धव्यवसायातून साधलेल्या भरभराटीतून येते. ते घेत असलेले परिश्रम व त्यांनी मिळवलेले यश इतरांना प्रेरणादायी ठरावे, असे मोठे आहे.
राजू शर्मा यांची वर्धा नदीला लागून, गणपती घाटाजवळ १४ एकर शेतजमीन आहे. शेतीला पूरक त्यांचा दुग्धव्यवसाय शेतातच आहे. त्यांचे वडील रेल्वेला नोकरीला होते. बदली बल्लारपूरला झाल्यानंतर नोकरी सांभाळत गाय व म्हशी विकत घेऊन घरीच दुधाचा व्यवसाय सुरू केला. घरातील सर्वच त्यात गुंतले. व्यवसाय वाढत गेला आर्थिक बाजू भक्कम झाल्यानंतर त्यांनी गणपती घाटाजवळील १४ एकर शेत विकत घेतले. दुधाचा धंदा शेतात हलविला. शेतीसोबतच मेहनत घेत त्यांनी दुग्धव्यवसायही वाढविला. आज त्यांच्याकडे दुधाळू ३५ म्हशी व १४ गायी आहेत. राजू शर्मा व त्यांची मुलं त्यात राबतात. एक मुलगा येथेच नोकरीला आहे. फावल्या वेळात तोही दूध दुभत्याचे काम करतो. शर्मा हे अल्पभूधारक नसल्याने शासनाचा कोणताही लाभ त्यांना मिळत नाही. स्वबळावरच त्यांना सर्व करावे लागते. शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय उत्तम आहे. जनावरांना चाऱ्याची सोय शेतीतून होते. बऱ्यापैकी आर्थिक लाभ होतो. परिश्रम आणि जनावरांची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. हल्ली निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पीक पुरेसे हातात येईलच, याची शाश्वती नाही. त्याची भरपाई दुग्ध व्यवसायातून होते, असे सांगत शर्मा यांनी म्हणूनच लहान-मोठ्या कास्तकारांनी पूरक धंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळावे, असा त्यांचा सल्ला सर्व कास्तकारांना आहे.