नागभीड : सध्या सर्वत्र ई-पीक नोंदणीची मोहीम जोरात सुरू असली तरी शेतकऱ्यांना या नोंदणीसाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून अनेक गमतीजमतीही समोर येत आहेत.
खरे तर आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात आला आहे. असे असले तरी तो प्रत्येकाला हाताळता येतोच, असे नाही. एखादे छायाचित्र म्हणा किंवा संदेश एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ग्रुपवर पाठवायचे असल्यास ते भलत्याच ग्रुपवर किंवा भलत्यालाच मिळाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. असेच किस्से सध्या ई-पीक नोंदणीमध्ये होत आहेत.
ई-पीक नोंदणीत शेतातील पिकासंदर्भातील इतर विविध माहितीसह शेतातील पिकाचा फोटो अपलोड करणे गरजेचे आहे. पण शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा चुकीने म्हणा भलतेच फोटो अपलोड होत असल्याची माहिती आहे. एका माहितीगार सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ई-पीक नोंदणी करताना एका शेतकऱ्याने गणपतीचा फोटो अपलोड केला आहे. तर दुसऱ्या एका शेतकऱ्याने जेवणावळीचा फोटो अपलोड केल्याची माहिती आहे. फोटो अपलोड करताना अशाच अनेक गमतीजमती होत असल्याची माहिती आहे.
यापूर्वी पीक नोंदणी गावातील तलाठी करायचे. पण तलाठ्यांकडून ही नोंदणी बरोबर होत नसल्याचा आरोप होत होता. म्हणून शासनाने ही पीक नोंदणी शेतकऱ्यांनी स्वतःच करावी, असे आदेश काढले. पण कधी अज्ञान तर कधी नेटवर्क प्राॅब्लेम यामुळे ही पीक नोंदणी शेतकऱ्यांच्या डोक्याबाहेर जात आहे.