चंद्रपूर : नागपुरातील बी.एम.सी. सोशल वेल्फेअर सोसायटी नामक संस्थेने विविध प्रलोभने दाखवून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पैसे घेतले. मात्र, फसवणूक लक्षात आल्याने पैसे परत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क संस्थेच्या संचालकाची कार ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी रत्नापूर येथे घडली. रक्कम परत मिळेपर्यंत संचालकाची कार परत देणार नाही, असा इशाराही संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
बी.एम.सी. सोशल वेल्फेअर सोसायटी या संस्थेने सिंदेवाही तालुक्यात काही व्यक्तींना कृषी सहायक म्हणून प्रशिक्षित केले. त्यानंतर संस्थेच्या कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना घेऊन १३३ कृषी गट तयार केले. एका गटात १५ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. १३३ गटांचे ५९ हजार ८५०० रुपये या एजंटांकडून संस्थेकडे जमा केले, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षण, माती परीक्षण, विमा, ७५ हजार रुपये अनुदान व इतर लाभ देऊ, असे प्रलोभन संस्थेने दाखविले. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील बरेच शेतकरी संस्थेसोबत जुळले. शेतकरी गटांचे करार करण्यात आले, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कार्यशाळेत नेमके घडले काय ?
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. रविवारी जिल्हा परिषद शाळा रत्नापूर येथे बी.एम.सी. सोशल वेल्फेअर सोसायटीचे संचालक बी. ई. मेश्राम यांच्या उपस्थितीत कार्यशाळा झाली. यावेळी सेंद्रिय शेतीसाठी निविष्ठा (खत) पुरवठ्यासाठी १५०० ते ३ हजार रुपये जमा करा, अशी सूचना संस्थेने केली. आधीच वसूल केलेल्या रकमेतून आतापर्यंत काही मिळाले नाही. मात्र, पुन्हा पैशाची मागणी केल्याने शेतकरी संतापले. संस्था प्रमुख मेश्राम यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर समाधानकारक उत्तरे दिली नाही. यातून वाद झाला. शेवटी शेतकऱ्यांनीच पोलिसांना कार्यशाळेत पाचारण केले. आतापर्यंत वसूल केलेले पैसे शेतकऱ्यांना परत करण्याचा समझोता झाला. मात्र, जोपर्यंत पैसे परत मिळत नाही तोपर्यंत संचालकाची कार ताब्यात ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. ही कार सध्या रत्नापूर येथे ठेवण्यात आली आहे.
‘संस्थेने आश्वासन दिलेल्या एकही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला नाहीत. सेंद्रिय खत पुरवठा करण्यासाठी पुन्हा ३ हजार रुपयांची मागणी केल्याने शंका निर्माण झाली. आता या संस्थेसोबत काम करायचे नाही. शेतकऱ्यांचे सर्व पैसे संस्थेने परत करावे.’
- शंकर कुंकूलवार, माजी सरपंच व शेतकरी, शिवणी
‘बी.एम.सी. सोशल वेल्फेअर सोसायटी ही संस्था विदर्भात २००४ पासून कृषी क्षेत्रात सेवारत आहे. आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक केली नाही. ज्यांना आमच्या योजनांबाबत असहमती असेल त्यांनी अर्ज केल्यास पैसे परत करू.’
- बी. ई. मेश्राम, संचालक, बी.एम.सी. वेल्फेअर सोसायटी, नागपूर