आवाळपूर : आरोग्यसेवा बळकट व्हावी या हेतूने नांदा फाटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारल्या जात आहे. परंतु आता हे आरोग्य केंद्र मानवी जीवनाच्या जीवावर उठणार की काय असा संशय येत आहे. बांधकाम अंतिम टप्प्यात असले तरी बांधकामात अवैधरीत्या आणलेले मुरूम वापरल्या जात आहे. मात्र महसून विभाग याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य केंद्राच्या बाजूलाच अवैधरीत्या जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन चालू आहे. शासनाच्या जागेवर विनापरवानगी उत्खनन करून शासनाची फसवणूक करण्याचे काम कंत्राटदार करीत असल्याचे दिसून येत आहे. या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ग्रामपंचायत व महसूल विभागाची परवानगी न घेता दिवसा ढवळ्या जेसीबी लावून रोज २० ट्रक अवैध मुरूम उत्खनन केल्या जात आहे.
कोट
माझ्याकडे त्यांनी कसल्याही प्रकारची परवानगी घेतली नसून याची मला माहिती नव्हती. चौकशी करण्यात येईल.
- विकास चीने, तलाठी साजा नांदा.
सदर बाबीची मला काहीही कल्पना नाही. भेट देऊन याबाबत चौकशी करण्यात येईल.
- आर. गेडाम, अभियंता, साईड प्रभारी उपविभाग, कोरपना.