चंद्रपूर : ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार घरकुल प्रस्तावांना निकाली काढून गरजूंना लाभ द्यावा. नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात अतिक्रमण असेल तर नागपूरच्या धर्तीवर ५०० फूट जागा देण्यासंदर्भात नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत सोमवारी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी वर्षा गौरकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराव भराडी, जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींसह दूरदृश्यप्रणालीद्वारे नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, घरकुल मंजुरीसाठी स्थानिक स्तरावर सोपी पद्धत अवलंबिणे आवश्यक आहे. घरकुलासाठी गावागावांत उपलब्ध जागेबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यात आढावा बैठक घ्यावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांकडून उपलब्ध जागेबाबत माहिती घ्यावी. जेथे जागा नाही, अशा ठिकाणी लाभार्थ्यांना जागा विकत घेऊन देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. न.प., नगरपंचायत क्षेत्रात अतिक्रमण असेल, तर नागपूरच्या धर्तीवर ५०० फूट जागा देण्याबाबत नियोजन करावे. भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी करून द्यावी, असे निर्देश दिले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गट ‘ड’ संदर्भात घरकुलाचे उद्दिष्ट १० हजार ७४१ आहे. यापैकी अनुसूचित जाती व जमातीसाठी ७ हजार ३५० आणि इतर प्रवर्गासाठी ३ हजार ३९१ घरकुलांचे उद्दिष्ट असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.