मूल : दिवसेंदिवस विद्युतच्या वापराने प्रदूषण मानवजातीसाठी घातक परिणाम करणारे ठरत आहे. त्यावर उपाय म्हणजे जास्तीतजास्त सौरऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. हे हेरून मूल शहरात प्रथमच गांधी चौकात सौरऊर्जेचे वाहतूक सिग्नल लावण्यात आले. हे सिग्नल व्यवस्थित सुरू असल्याने सौरऊर्जेचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. यासाठी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात असल्याने, सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक वाढला असून, मूल शहरात दुकाने, घरात, कार्यालय, राइस मिल आदी ठिकाणी सौरऊर्जा संच बसविण्यात आला आहे. त्यामुळे प्रदूषणावर काही प्रमाणात आळा बसणार आहे.
प्रदूषण ही फार मोठी समस्या असून, दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. विद्युतचा वापर घरापासून तर कारखान्यापर्यंत केला जातो. यात होणारी स्पार्किंग असो की, जास्त दाबामुळे जळणारे ट्रान्स्फार्मर असो यामुळे सर्वत्र प्रदूषण पसरत असते. यासाठी सौरऊर्जेवर चालणारी विद्युत वाहिनीचा वापर करणे आवश्यक ठरते. हे हेरून मूल शहरात घरगुतीपासून तर औद्योगिक कामासाठी सौरऊर्जाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. प्रदूषण वाढू नये, यासाठी शासनाने प्लास्टीकवर बंदी घातली आहे. मात्र, आडमार्गाने काही प्रमाणात प्लास्टीकचा वापर सुरू आहे. हा वापर बंद होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच दुचाकीऐवजी सायकलचा वापर झाल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.