चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून चष्म्याऐवजी काॅन्टॅक्ट लेन्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, लेन्स वापरताना पुरेशी काळजी न घेतल्यास जंतूसंसर्ग होऊन डोळ्यांसाठी महागात पडू शकते. त्यामुळे योग्य पद्धतीने आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच लेन्स वापरणे गरजेचे आहे.
सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण लेन्स वापरू लागले आहेत. चष्मा म्हटला की, अनेकांना तो नकाेसा वाटतो. मात्र, चष्मा लागल्यानंतर त्याला टाळताही येत नाही. चष्मा वापरण्याशिवाय पर्याय नसल्याने काहीजण काॅन्टॅक्ट लेन्स वापरतात. मात्र, खूप काळजी घेणे महत्त्वाचे आहे, नाही तर जिवावरही बेतू शकते.
बाॅक्स
चष्म्याला करा बाय बाय
अनेकांना चष्म्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. चष्मा आहे म्हणून विवाहात अडथळा येतो, असा अनेकांचा अनुभव आहे.
काॅन्टॅक्ट लेन्समुळे चष्म्यापासून सुटका मिळू शकते. लेन्स डोळ्याच्या आत असल्यामुळे बाहेरून दिसत नाही. त्यामुळे लेन्स वापरण्याकडे विशेषत: तरुणांचा समावेश अधिक आहे.
कोट
नेत्रतज्ज्ञ म्हणतात...
ज्यांना चष्मा लागलेला आहे, त्यांनी चष्म्याचा वापर नियमित करावा. काॅन्टॅक्ट लेन्स वापरताना डाॅक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा. लेन्स वापरताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. रात्री झोपताना लेन्सचा वापर करू नये.
-डाॅ. चेतन खुटेमाटे
नेत्ररोग तज्ज्ञ, चंद्रपूर
बाॅक्स
ही घ्या काळजी
काॅन्टॅक्ट लेन्सच्या वापरामुळे लेन्स डोळ्यात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री झोपताना लेन्सचा वापर करू नये.
लेन्सचा वापर दिवसभरात ७ ते ८ तास करावा. अधिक वेळ लेन्सचा वापर केल्यास डोळ्यांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अशावेळी लेन्स घातलेली असेल तर डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.