सिंदेवाही : वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे; परंतु आजही अनेकजण महामार्गावरील तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. हा प्रकार त्यांच्या व इतरांसाठीही धोकादायक ठरणारा आहे.
पोलिसांनी वाहन थांबवून थातूरमातूर कारवाई करण्याऐवजी योग्य ती कारवाई केल्यास होणाऱ्या अपघातांपासून सुटका तरी होऊ शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. माणसांच्या हातात स्मार्टफोन आला खरा; पण माणसे स्मार्ट झाली का, हा खरा प्रश्न आहे. अनेकजण वाहन चालवित असताना मोबाइलवर बोलतात. अशावेळी मागून येणाऱ्या किंवा समोरून अचानक येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही आणि अपघात घडतात. एकीकडे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस तारेवरची कसरत करीत आहे. दुसरीकडे अल्पवयीन वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण सुसाट व मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असताना दुसऱ्याच्या जिवाशीही त्यांचा खेळ सुरू असतो. पोलिसांनी यावर आळा घालावा,अशी मागणी आहे.