सिंदेवाही : वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे; परंतु आजही अनेकजण महामार्गावरील तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. हा प्रकार त्यांच्या व इतरांसाठीही धोकादायक ठरणारा आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक नाही
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमादरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. सदर महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा महामार्गापैकी एक आहे. त्यामुळे दिवसरात्र या मार्गावरून आवागमन सुरू असते, परंतु दिशादर्शक नसल्याने त्रास होत आहे.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
चंद्रपूर-वणी मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढवा
घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मद्यपी विविध मार्गाने दारू तस्करी सुरू आहे. पोलीस कारवाई करत आहे. परंतु, तस्करीच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येते. पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी आहे.
पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा
चिमूर : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. पण, विम्याचा लाभ मिळाला नाही. यावर्षी शेतीचे नुकसान झाले. विमा रकमेसाठी शेतकरी कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत.
घंटागाडीची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरात दररोज सकाळी घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र काही वॉर्डातील घंटागाडींची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा कचरा रस्त्यावर सांडत आहे. त्यामुळे स्वच्छतेचे तीन तेरा वाजत आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन संबंधित विभागाला कचरा ट्राली दुरुस्ती करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी आहे.
नळयोजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावात नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावात नळयोजनेचे पाणी मिळत नाही.
रिक्त पदांमुळे योजना पोहोचल्याच नाही
कोरपना : कृषी विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, विविध पदे रिक्त असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सुधारित आकृतीबंधानुसार अनेक पदांना मंजुरी आहे.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
कोरपना : येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचारीही नाही. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागते आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे याचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. कोरोनामुळे सध्या रस्त्यावर कमी वाहतूक आहे.
जुन्या वाहनांना कालबाह्य करावे
घुग्घुस : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
गावांना रस्त्याची प्रतीक्षा
वरोरा : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागते. अनेक गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अनेकदा रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली.
रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात
सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
केरोसिनचा पुरवठा करावा
जिवती : केरोसिनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसिन बंद झाल्याने अडचण जात आहे. त्यामुळे केरोसिन पुरविण्याची मागणी आहे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता
गडचांदूर : गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र गतिरोधक नसल्याने हा महामार्ग धोकादायक ठरत आहे. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बसस्थानक) व वीर बाबुराव शेडमाके चौक येथे गतिरोधक नाही.
खैरगाव रस्त्याची निर्मिती करावी
कोरपना : शहरातील तलावापासून खैरगाव व शेतशिवाराकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे. रस्ता झाल्यास नागरिकांसाठी सोईचे होणार आहे. त्यामुळे या बाबीकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे.