सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील प्राध्यापक, विशेषज्ज्ञ, अधिपरिचारिका आदी पदे रिक्त असल्याने वैद्यकीय शिक्षण व रूग्ण्सेवेवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत पुरवणी विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्यान केली.
विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनांची शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२०२० चे प्रलंबित तसेच थकित शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळण्याबाबत विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापन संघटनेने शासनाकडे मागणी केली आहे. विनाअनुदानित संस्था आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. सहा महाविद्यालयांना शासनाकडून मिळणारी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९- २०२० चे प्रलंबित तसेच थकित शिक्षण शुल्काची रक्कम तसेच कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थांना मिळणे दुरापास्त झाले आहे. शिक्षण शुल्काची प्रतिपूर्तीची रक्कम प्रलंबित असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे ५ ते ६ महिन्यांचे वेतन अदा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रलंबित शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्यान विधानसभेत केली. या मुद्यांच्या अनुषंगाने कार्यवाहीचे निर्देश देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. राजुरा तालुक्यातील विहिरगाव व मूर्ती येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड विमानतळासाठी वनजमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याची मागणीही यावेळी आ. मुनगंटीवार यांनी चर्चेदरम्यान केली.