सावली: सावली येथील नगरपंचायतमध्ये लेखापाल, स्थापत्य अभियंता व कर निरीक्षक अशी महत्वाची पदे रिक्त असल्याने सावली शहराचा विकास खोळंबला आहे.
सावली नगरपंचायत स्थापनेला आज सहा वर्षाचा कालावधी लोटला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात नगराचा विकास झालेला नाही. सावली नगर पंचायतीतील लेखापाल, स्थापत्य अभियंता व कर निरीक्षक अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने दलित वस्तीतील कामे, नगरोत्थान, रस्ता बांधकाम इत्यादी कामे रखडली आहेत. वेळेवर अंदाजपत्रक तयार होत नसल्याने नगरातील कामे प्रलंबित आहेत. त्यातच लेखापाल पद रिक्त असून अनेक कामांची देयके थांबलेली आहेत. त्यामुळे मंजूर कामांना विलंब होत आहे. सावली नगरपंचायतमध्ये गोंडपिपरी येथील लेखापाल व मूल येथील स्थापत्य अभियंता यांना प्रभारी नियुक्ती केल्याने वेळेवर अंदाजपत्रक होत नसल्याने विकास कामे प्रलंबित आहेत. परिणामी सावली नगराचा विकास दिवसेंदिवस खुंटत चालला असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील सावली नगर पंचायतीला महत्वाची पदे रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शासन स्तरावर पाठपुरावा करून रिक्त पदांचा भरणा करण्याची मागणी सावलीकराकडून केली जात आहे.
कोट
सावली नगरपंचायतमध्ये महत्त्वाची पदे रिक्त असल्याने विकासाची गती मंदावली असून जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यास विलंब होत आहे. लवकरात लवकर रिक्त पदांची भरती करण्यात यावी. जेणेकरून शहराच्या विकासाला चालना मिळेल. अन्यथा आम्हा सावलीकरांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
- संदीप पुण्यपकार, सामाजिक कार्यकर्ता सावली.
260721\img-20210726-wa0198.jpg
नगर पंचायत