रूग्णांना अडचणी : महत्त्वाच्या रूग्णालयांत ३०७ पदे रिक्त चंद्रपूर : राज्य शासनाकडून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. जिल्ह्यातील ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील तब्बल ३०७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा पुरती खिळखिळी झाल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ९ अॅलोपॅथीक दवाखाने, १० आर्युवेदीक दवाखाने, ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये आहेत. यापैकेी ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये चारही संवर्गातील ९२० पदे मंजूर आहेत. यातील केवळ ५१३ पदे भरण्यात आली असून ३०७ पदे गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. तर आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचीही हीच अवस्था आहे. रिक्त पदांमध्ये एकाच अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याने ते योग्य सेवा देण्यास असमर्थ ठरत आहेत. याचा त्रास रूग्णांना प्रचंड प्रमाणात सहन करावा लागत आहे. रूग्ण दाखल झाल्यास डॉक्टर उपस्थित राहत नाही, डॉक्टर असेल तर दुसरे कर्मचारी राहत नाही, अशी स्थिती जवळपास अनेक रूग्णालयात दिसून येते. त्यामुळे रूग्णावर वेळेवर उपचार होवू शकत नसल्याचेही प्रकार घडले आहेत. वरोरा, चिमूर व मूल या तीन उपजिल्हा रूग्णालयात वर्ग १ चे ३ पदे मंजूर असून एकच पद भरण्यात आले आहे. वर्ग २ च्या २९ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या ९५ पदांपैकी ३४ तर वर्ग ४ च्या ४६ पदांपैकी २५ पदे रिक्त आहेत. तर दहा ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ चे १० पदे मंजूर असून ९ पदे रिक्त आहेत. वर्ग २ च्या ३१ पदांपैकी ६ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या १५४ पदांपैकी ४४ तर वर्ग ४ च्या ७० पदांपैकी २० पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरून आरोग्य सेवा बळकट करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)जिल्हा सामान्य रूग्णालयात १६६ पदे रिक्त अत्यंत महत्त्वाचे रूग्णालय समजल्या जाणाऱ्या चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रूग्णालयात तब्बल १६६ पदे रिक्त आहेत. या रूग्णालयात वर्ग १ च्या २० पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. वर्ग २ च्या ३७ पदांपैकी १ रिक्त, वर्ग ३ च्या २७९ पदांपैकी ८५ पदे रिक्त असून वर्ग ४ संवर्गातील १७६ मंजूर पदांपैकी तब्बल ७० पदे रिक्त आहेत. रूग्णवाहिका आहेत, मात्र चालक नाहीतीन उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयासाठी १०२ क्रमांकाच्या ३० रूग्णवाहिका आहेत. मात्र चालकाचे २४ पदे भरली असून जिल्हा सामान्य रूग्णालयात ३, वरोरा, सिंदेवाही व चिमूरच्या रूग्णालयात चालकाची पदे रिक्त आहेत. तसेच १०८ क्रमांकाच्या २१ रूग्णवाहिका असून याही रूग्णावाहिकांना चालक नाही.
रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा खिळखिळी
By admin | Published: February 16, 2017 12:37 AM