लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : कोरोना संसर्ग रोग प्रतिबंधात्मक लस घेण्याला येथील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, बल्लारपूर तालुक्यात शनिवारपर्यंत एकूण पाच हजार ४५१ जणांनी लस घेतली आहे.
बल्लारपूर तालुक्यात आतापर्यंत फक्त दोनच लसीकरण केंद्र सुरु होती. संभाव्य स्थिती बघता येथे शहरी भागात नव्याने चार लसीकरण केंद्र व ग्रामीण भागात दोन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. आता बल्लारपूर, विसापूर व बामणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकूण आठ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी गजानन मेश्राम यांनी दिली. यात ग्रामीण रुग्णालयात, बल्लारपूर, नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र वस्ती विभाग, वेकोलि रुग्णालय, नगर परिषद नाट्यगृह व बी. एम, ए. हाॅल झाकिर हुसेन वॉर्ड, पियुसी केंद्र, विसापूर व बामणी उपकेंद्र यांचा समावेश आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सर्वसाधारणपणे ४५ वयोगटावरील व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद बघता, नव्या लसीकरण केंद्रासोबतच सुट्टीच्या दिवशीही लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयाचे लोकांनी स्वागत केले आहे.