पोंभुर्णा : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल तालुक्याच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत असून येत्या तीन वर्षात पोंभुर्णा तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त, वन व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मध्य चांदा वनविभाग अंतर्गत पोंभुर्णा येथील वनविभाग अंतर्गत बांधण्यात आलेल्या निरीक्षण कुटीच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कल्पना कावळे या निराधार महिलेच्या हस्ते कुटीचे लोकार्पण करण्यात आले. तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांना मुक्कामासाठी विश्रामगृहाची गरज असल्याने या ठिकाणी ४ कोटी रुपये मंजूर करुन दिले. त्यामुळे याठिकाणी लवकरच या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना वास्तव्यास (मुक्कामी) राहण्यास अडचण निर्माण होणार नाही. पोंभुर्णा शहराच्या विकासासाठी नगर पंचायतीला ७ कोटींचा निधी दिला असून जानाळा-पोंभुर्णा मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २५ कोटी रुपयाची निधी मंजूर केला आहे. तर जुनोना-पोंभुर्णा रस्त्यासाठी ८० कोटी रुपयाचा निधी मंजूर करणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंदन सिंग चंदेल, प्रमोद कडू, हरीश शर्मा, राम लखीया, कल्पना कावळे, नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, उपाध्यक्ष ईश्वर नैताम, पंचायत समिती सभापती चिंचोळकर, उपसभापती महेश रणदिवे, राहुल संतोषवार, अजित मंगलगिरीवार, अल्का आत्राम, नंदू मुम्मलवार, मुख्यवनसंरक्षक संजय ठाकरे, आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पोंभुर्णा येथे वनविभागाच्या निरीक्षण कुटीचे लोकार्पण
By admin | Published: January 11, 2016 12:58 AM