तालुक्यात लसीकरणाची ही मोहीम नागभीडचे ग्रामीण रुग्णालय व इतर पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत सुरू आहे. या लसीबद्दल प्रारंभी सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींनाच ही लस देण्यात आली. यात आरोग्य सेवक, शासकीय डॉक्टर, खासगी दवाखान्यातील डॉक्टर व त्यांचे मदतनीस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलातील जवान यांचा यात समावेश होता. त्यानंतर प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून ही लस सार्वजनिक करण्यात आली आहे. १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीस ही लस देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्याची लोकसंख्या १ लाख ३४ हजार ३२० आहे. २९ मेपर्यंत तालुक्यात १८ हजार ६७५ व्यक्तींनी ही लस टोचून घेतली आहे. लसीकरणाचे हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के आहे. यात १८ वर्षांवरील १ हजार ३६३ व्यक्तींचाही समावेश आहे. या लसीकरण मोहिमेत नागभीड ग्रामीण रुग्णालयामध्ये ५ हजार ९२५, नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्र १ हजार ८०९, मौशी प्राथमिक आरोग्य केंद्र १ हजार ४३७, बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र १ हजार १८, वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्र ३ हजार ७५ आणि तळोधी प्राथमिक आरोग्य केंद्रातून ४ हजार ४८ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती आहे.