चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत व्यापाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुनगंटीवार यांनी लवकरच असे सेंटर सुरू करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले. त्यानुसार जलाराम भवन चंद्रपूर येथे फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स आणि इंडस्ट्रीज व चंद्रपूर महानगरपालिका यांच्या तर्फे व्यापारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आमदार मुनगंटीवार यांनी पुढील काही दिवसात नियमानुसार १८ ते ४५ या वयोगटासाठीसुद्धा लसीकरण मोहीम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, नगरसेवक संजय कंचर्लावार, राजेंद्र अडपेवार, फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रामकिशोर सारडा, सुमेश कोतपल्लीवार, अनिल टहलियानी, पंकज शर्मा, राजेश सादराणी, प्रभाकर मंत्री, रामजीवन परमार, मधुसूदन रूंगठा, दामोधर सारडा, दिनेश बजाज, संतोष चिल्लरवार, गिरीष चांडक व गिरीष उपगन्लावार यांची उपस्थिती होती.
जलाराम सेवा मंडळाने हे सभागृह निःशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल मनीषभाई सुचक व रवी कारिया यांचे याप्रसंगी आभार मानण्यात आले.