राजू गेडाम - मूलवनाचे व वन्य जीवांचे संरक्षण व्हावे, यासाठी वनविभाग प्रयत्नरत असताना एका वनमजुराने जंगलात स्वखर्चाने वनकुटी उभारून वन्य जीवांच्या संरक्षणासाठी पाऊल उचलले आहे. भिकारू शेंडे असे प्रेरणादायी काम करणाऱ्या वनमजुराचे नाव आहे. भिकारू शेंडे यांनी घनदाट जंगलात कक्ष क्र. ३२३ मधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मारोडा परिक्षेत्रात स्वखर्चाने वनकुटी उभारली. महाराष्ट्रातील सर्व व्याघ्र प्रकल्पातील वनमजुरांनी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कंबर कसली तर वन्यजीवांसोबतच वनाचेसुद्धा संरक्षण होईल. सर्व वनमजुरांनी यातून प्रेरणा घ्यावी, असेच भिकारू शेंडे यांचे काम आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल वनपरिक्षेत्र बफर झोनची निर्मिती झाल्यानंतर स्वतंत्र्य वन्यजीवांचे व वनाचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वतंत्र्यपणे बफर झोनच्या अधिकाऱ्यांवर आली. मूल वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कक्ष क्र. ३२३ मधील कुटी क्रमांक तीन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ६५९.२३ हेक्टर आर घनदाट जंगल आहे. येथे वनविभागाने वनसंरक्षणासाठी इमारतीचे बांधकाम केले आहे. या घनदाट जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, रानडुकरे, सांबार, चितळ, सारई, कोल्हा, खेकडी कोल्हे, तडस, लांगडा, रानकुत्रे आदी प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे वनविभागाला आढळले आहे. वनाबरोबरच प्राण्यांचेसुद्धा संरक्षण होणे तेवढेच महत्वाचे आहे. मात्र जंगलात एका इमारतीच्या साह्याने वनाचे तसेच वन्यप्राण्याचे संरक्षण करणे कठीण असल्याचे हेरुन येथील वनमजूर भिकारू पांडुरंग शेंडे यांनी बांबूने संरक्षीत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वनकुटीची निर्मिती केली. मात्र समोर नाला असल्याने पावसाळ्याच्या दिवसात ये-जा करावी लागते, ही बाब लक्षात घेऊन बांबुचा पूल तयार करण्याची योजना आखली. आपल्या सहकारी वनमजुरांच्या मदतीने त्यांनी पूल तयार केला. त्यामुळे वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवणे सोईचे झाले आहे. प्रकाशासाठी सौर ऊर्जेवर चालणारे दोन बल्ब आहेत. या घनदाट जंगलात विजेची सोय नाही. येथे एकमेव बोअरवेल आहे. सौरऊर्जेवर चालणारी बोअरवेल वनविभागाने दिल्यास त्या पाण्याचा वापर वन्यप्राण्यांचासुद्धा होऊ शकतो.
वनमजुराने स्वनिधीतून साकारली वनकुटी
By admin | Published: January 06, 2015 10:58 PM