जनावरांवर उपचार: शेतकऱ्यांनी घेतला लाभबल्लारपूर : बिल्ट ग्राफीक पेपर प्रॉडक्ट द्वारा पुरस्कृत बिल्ट जनसमृद्धी प्रकल्प संचालित बाएफ मित्र-नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा कोर्टीमक्ता येथे वंधत्व निवारण शिबिर तसेच शेतकऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला टोंगे, प्रमुख पाहुणे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर, असिस्टंन्ट मॅनेजर नितीन देशमुख, डॉ. रूपेश कुकडे, सहायक समन्वयक शाम मडावी, गणेश टोंगे, चंदू साळवे, देविदास सोयाम, सतिश टोंगे उपस्थित होते.वंधत्व शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक जनावरांवर औषधोपचार, वांझपणा तपासणी, गर्भधारणा तपासणी, कृत्रिम रेतन, गोचीड नाशक उपचार करण्यात आले. पशुपालकांना मार्गदर्शन करताना डॉ. नंदकिशोर मैंदळकर म्हणाले, गोधन म्हणजे शेतकऱ्यांचा आत्मा होय. ते एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. त्याला स्वस्थ ठेवायचे असेल तर व्यवस्थापन योग्य होणे गरजेचे आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी व पशुपालक हवालदिल झालेला आहे. बिल्ट जनसमृद्धी संचालित बाएफ मित्र आपल्या सोबतीला आहे. आपण न घाबरता शेतीला जोडधंदा दुग्धोत्पादन, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय केल्यास निश्चितच फायदा मिळेल. कृत्रिम रेतन करून जास्त दुध देणारी गाय निर्माण करता येईल. त्यामुळे गावात दुध वाढेल. प्रत्येकाने एक एकर शेती वैरणीकरीता राखीव ठेवावी व किमान दोन गायी घरी पाळाव्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दुसऱ्याची मोलमजुरी करण्याची गरज पडणार नाही कोणीही आत्महत्येचा विचार आणू नये पशुंचे पालनपोषण करा लक्ष्मी घरी आल्याशिवाय राहणार नाही. जनावरे कसायाला न विकण्याचा संकल्प यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून करून घेण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
वंधत्व निवारण व शेतकऱ्यांचे प्रशिक्षण
By admin | Published: February 22, 2016 1:21 AM