चंद्रपूर: भावी जीवनाचे स्वप्न डोळ्यात घेऊन येथे लग्न करण्यासाठी आलेल्या वराला लग्न न करताच परत जावे लागले. नागपूर येथील रहिवासी असलेल्या या वराला लग्नाच्यावेळी चक्कर आली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. वराला ‘मिरगी’ची बिमारी आहे, असे कारण देत वधू पक्षाने लग्नासाठी नकार दिला. प्रकरण रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले. तेथेही तडजोड न झाल्याने अखेर वराला वऱ्हाडासह आल्यापावली परत जावे लागले.त्याचे असे झाले की, चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील एका युवतीचे लग्न नागपूर येथील एका युवकाशी जुळले. २२ जून रोजी बायपास रोडवरील एका सभागृहात लग्न समारंभ पार पडणार होता. त्यासाठी नागपूर येथील वरासह वऱ्हाड चंद्रपुरात दाखल झाले. वऱ्हाड अगदी वेळवर लग्न समारंभस्थळी पोहचले. लग्नाच्या काही विधीही आटोपल्या. मात्र शेवटच्या विधीसाठी वर व्यासपिठावर चढत असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो व्यासपिठावरच कोसळला. उपस्थितांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. दरम्यान, वराला ‘मिरगी’ चा आजार असल्याची शंका वधू पक्षाकडील मंडळींना आली. त्यांनी ती बोलून दाखविताच वर व वधू पक्षामध्ये चांगलाच वाद सुरू झाला. इकडे उपचारानंतर प्रकृती चांगली होताच, वर पुन्हा वधू मंडपी पोहचला. तेथे त्याला वेगळेच चित्र दिसले. वधू पक्षाने लग्नासाठी चक्क नकार दिला. त्यामुळे वर पक्षाने पोलीस ठाण्याचा रस्ता धरला. वराने पोलिसांना आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी वधू पक्षालाही पाचारण करून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वधू पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम होता. (प्रतिनिधी)
लग्न न करताच वऱ्हाड परतले
By admin | Published: June 25, 2014 12:23 AM