मूल : येथील गृहिणी महिला बचत गटाचा १०व्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मूल नगर परिषदेच्या अध्यक्ष रत्नमाला भोयर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहणे म्हणून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद मूलचे प्रकल्प अधिकारी रितेश भोयर, जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थापक आर. डी. वाळके, नंदु मडावी, मूल नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती शांता मादाडे, नगरसेविका नलिनी फुलझेले, वंदना वाकडे, माविमचे प्रशांत भेंदारे आदी उपस्थित होते. नगर परिषद मूल व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने येथील बचत गटाला स्वावलंबी होण्यासाठी मातीची विविध प्रकारची घरगुती उपयुक्त भांडी तसेच मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे सदर व्यवसाय उत्तम सुरू असून, त्या व्यवसायातून त्या आत्मनिर्भर झाल्या, असे प्रास्ताविक भाषणातून बचत गटाच्या अध्यक्ष मंदा चल्लावार यांनी सांगितले.
व्यवसायाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी नगर परिषदेने गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
या वेळी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर व प्रकल्प अधिकारी रितेश भोयर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नलिनी आडपवार, प्रास्ताविक मंदा चल्लावर तर उपस्थितांचे आभार उज्ज्वला खोब्रागडे यांनी मानले.