यात उमेदवारांच्या खर्चासह उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र आदी विविध कामांचा समावेश आहे. या प्रकाराने सामान्य नागरिक आणि हरलेल्या आणि जिंकलेल्या उमेदवारांना मनस्तापास सामोरे जावे लागत आहे.
येथील तहसीलदार मनोहर चव्हाण आणि नायब तहसीलदार संदीप भांगरे मागील आठवड्यापासून रजेवर आहेत. या तहसील कार्यालयातील विविध कामांसाठी संगणीकृत स्वाक्षरीचा अधिकार या दोन अधिकाऱ्यांनाच होता, अशी माहिती आहे. हे अधिकारी रजेवर गेल्यानंतर तहसील कार्यालयाचा प्रभार नायब तहसीलदार सुप्रिया वक्ते यांच्याकडे आला. मात्र तोपर्यंत त्यांनी संगणीकृत स्वाक्षरीची वरिष्ठांकडे मागणी केली नव्हती. वक्ते यांना संगणीकृत स्वाक्षरीचे अधिकार प्रदान करण्यात आले नसल्याने तहसील कार्यालयातील विविध कामे अडली आहेत. यात उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, यासह तहसीलशी संबंधित बहुतेक सर्वच कामांचा यात समावेश आहे.
आता या विविध कामांसाठी नागरिक तहसील कार्यालयात येत असले तरी त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. विश्वसनीय माहितीनुसार स्वाक्षरीची व्याप्ती व गरज लक्षात आल्यानंतर प्रभारी तहसीलदार सुप्रिया वक्ते यांनी संगणीकृत स्वाक्षरीसाठी वरिष्ठ पातळीवर मंजुरीची मागणी केली असली तरी ही मंजुरी केव्हा मिळते, याची निश्चिती नाही.
बॉक्स
उमेदवारांचे खर्चही अडले
नागभीड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एका महिन्याच्या आत निवडणुकीचा खर्च संबंधित विभागाकडे सादर करण्यात यावा असे निर्देश आहे. या नियमाचा भंग झाल्यास सदर उमेदवार हा पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरतो अशी माहिती आहे.
हा खर्च सादर करण्यासाठी एका शपथपत्राची गरज असून, हे शपथपत्र निवडणूक हरलेल्या व जिंकलेल्या उमेदवारांनी तयार केले आहे. आता हे उमेदवार हे शपथपत्र व खर्चाचे व्हाऊचर घेऊन खर्च सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात येत असले तरी कार्यरत प्रभारी तहसीलदार यांना या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे या उमेदवारांचीही मोठी कोंडी झाली आहे. यासंदर्भात शनिवारी प्रभारी तहसीलदार वक्ते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.