प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : वेकोलीतून मोठ्या प्रमाणात कोळशाची ओव्हरलोड वाहतून करण्यात येत असून, मुख्य मार्गावरून कोळसा वाहतूक करताना कोळसा भरलेल्या ट्रकवर ताडपत्री न झाकता जीवघेणी कोळसा वाहतूक सुरू आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
राजुरा तालुक्यात दगडी कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे आहेत. त्यामुळे वेकोलीने गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, परिसरात खुल्या कोळसा खाणींचे निर्माण केले. वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणीतून सिमेंट कंपन्यांसह इतर ठिकाणी कोळशाची वाहतूक केली जाते. सध्या वेकोली परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. दिवसरात्र कोळशाची वाहतूक सुरू असल्याने रस्त्याचे लवकर बारा वाजण्याची शक्यता आहे. कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याची दुरवस्था झाल्याने अनेकदा गोवरी-पोवनी-राजुरा, सास्ती रामपूर-राजुरा मार्गावर अनेकदा अपघात होऊन नागरिकांना नाहक जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वेकोलीने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून कोळशाची वाहतूक सुरू ठेवली आहे.
मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस अपघातात वाढ झाली आहे. ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याची दुरवस्था झाल्यानंतरही गोवरी, पोवनी, सास्ती, रामपूर, राजुरा मार्गावरून वाहतूक करणारे ट्रक नियमानुसार ताडपत्री न झाकता दिवसरात्र धावत असतात. यामुळे बारीक कोळसा पडून प्रदूषण तर होतेच, शिवाय कोळशाचे ढेले पडून मोठी दुर्घटना झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण कुणाचे? रस्ते देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. मात्र, करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते ओव्हरलोड वाहतुकीमुळे खराब होत आहेत. रस्त्याच्या क्षमतेपेक्षाही जड वाहने रस्त्यावर धावत असल्याने अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था होण्याची शक्यता आहे. मात्र, ओव्हरलोड कोळसा वाहतु कीवर नियंत्रण ठेवणार कोण, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.