अतिक्रमण हटविण्याची मागणी
चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे या चौकामध्ये गर्दी कमी आहे. अन्य वेळी हा चौक सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी निधी नाही. पावसाळा सुरू होण्यास आता काही दिवस आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
अर्थव्यवस्था ढासळण्याची चिंता
चंद्रपूर : मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ढासळत आहे. सध्या व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक घडी विस्कळीत होत आहे.
भाजीपाला विक्रीला दुचाकीचा आधार
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे प्रत्येकांवर निर्बंध आले आहे. त्यामुळे भाजीपाला व्यावसायिकांनाही सकाळी ११ वाजेपर्यंत भाजीपाला कसा विकास हा प्रश्न पडला आहे. यावर उपाययोजना करीत काही व्यावसायिकांनी वाॅर्डावाॅर्डात जाऊन दुचाकीद्वारे भाजीपाला विक्री सुरू केली आहे. विशेष म्हणजे, अनेकांनी आपला व्यवसाय सोडून जीवनावश्यक असलेल्या भाजीपाला विक्रीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
राशन दुकानांनाही बंदोबस्त द्यावा
चंद्रपूर : लाॅ्कडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहे. असे असले तरी जीवनावश्यक असलेले स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण केले जात आहे. कालपर्यंत सकाळी ११ वाजेपर्यंतच विक्री करण्याची परवानगी होती. आता वेळ वाढवून देण्यात आला आहे. येथील गर्दी लक्षात घेता येथे बंदोबस्त द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोनामुळे व्यावसायिकांचे हाल
चंद्रपूर : कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिकांची मोठी फजिती होत आहे. यामध्ये भाजीपाला, दूध विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पहाटेच काही दूध विक्रेते शहरात दाखल होत आहे. तर भाजीपाला पिकविणारे शेतकरी गावातच विक्री करण्यावर लक्ष देत आहेत.
मोकाट प्राण्यांची उपासमारी
चंद्रपूर : लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. परिणामी मोकाट प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था त्यांना खाऊ घालत आहे. मात्र मोकाट प्राण्यांची संख्या अधिक असल्याने त्या प्रत्येकांना भोजन मिळत नसल्याची स्थिती आहे.
नागरिकांना आर्थिक भुर्दंड
चंद्रपूर : ग्रामीण भागातील काही नागरिक खरेदीसाठी शहरात येत आहे. मात्र गावातील बहुतांश बस बंद असल्यामुळे प्रवाशांना ऑटो तसेच इतर साधनांमधून प्रवास करावा लागत आहे. ऑटोचालक प्रवाशांकडून अतिरिक्त पैशाची मागणी करीत आहे. यामध्ये प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.