चंद्रपूर : अवकाळी पावसाचा पिकाला मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला असून, टमाटरने शंभरी गाठली आहे, तर कांद्याने आपली फिफ्टी पूर्ण केली आहे. वाढत्या टमाटरच्या दराने एक किलो टमाटर खरेदी करणाऱ्यांना केवळ पावभर टमाटर खरेदी करावे लागत आहेत. वाढत्या भाजीपाल्याच्या दराने महिलांचे किचनचे बजेट बिघडले आहे.
चंद्रपूर शहरात नागपूर येथून भाजीपाला आणला जातो, तसेच ग्रामीण भागातील काही शेतकरीसुद्धा भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात. मात्र, मागील आठवड्यात बहुतेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. परिणामी, नागपूर बाजापेठेत भाजीपाल्याची आवक मंदावली, तसेच ग्रामीण शेतकऱ्यांनासुद्धा मोठा फटका बसला. त्यामुळे त्यांचासुद्धा माल विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी, भाजीपाल्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली.
एक महिन्यापूर्वी ३० रुपये किलो दराने विक्रीला जाणारे टमाटर चक्क शंभर रुपयांवर गेले आहेत. यासोबतच कांदे ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत, तर फुलकोबी ६० रुपये, कारले ६०, भेंडी ६०, वांगे ४०, आलू ३० रुपये किलो प्रतिदराने विक्रीला आले आहेत. सततच्या दरवाढीने सर्वसामान्य कुटुंबाचे मोठे हाल झाले आहेत. तेलाच्या तसेच भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीने गृहिणीचे किचनचे बजेटच कोलमडले आहे.
भाजीपाल्याचे दर (प्रतिकिलो)
टमाटर - १००
कांदे - ५०
फुलकोबी - ६०
पत्ता कोबी - ५०
कारले - ६०
भेंडी - ६०
सांभार - ८०
शेंगा - ६०
आलू - ३०
पहिले तेलाच्या किमती वाढल्या. आता भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. कोरोनाने पूर्वीच मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
-प्रतिमा कोडापे, गृहिणी
टमाटरचे दर शंभरावर पोहोचले आहे. यासोबतच इतर भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. रोजदारीचे काम मिळेनासे झाले आहे. घर कसे चालवावे, हा प्रश्न आहे.
-संजना रायपूरे, गृहिणी